अहमदाबाद – गुजरात एटीएसने सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना मुंबईतून अटक करून गुजरातेत आणले असून त्यांनी त्यांना अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या विरोधात बनावट माहिती सादर करणे, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, अशा स्वरूपाची काही नवीन कलमेही लावण्यात आली आहेत.
गुजरात पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक डी. बी. बारड यांनी त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवल्यानंतर गुजरात एटीएसचे पथक त्यांना आणण्यासाठी मुंबईत गेले होते. त्यांनी सेटलवाड यांना त्यांच्या घरात जाऊन ताब्यात घेतले. आणि अहमदाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले.
सन 2002 मध्ये गुजरातेत झालेल्या दंगल प्रकरणात तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि अन्य जणांच्या विरोधातील आरोपांच्या चौकशीसाठी जी एसआयटी सुप्रिम कोर्टाच्या संमतीने स्थापन करण्यात आली होती त्या एसआयटी समोर खोटी माहिती व खोटी कागदपत्रे सादर केल्याची सेटलवाड यांच्या विरोधात मुख्य तक्रार आहे.
नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची निर्दोष सुटका केली आहे. त्यानंतर सेटलवाड यांच्या विरोधात गुजरात सरकारने हे पाऊल उचलले आहे.