“जुडवा 2′ मध्ये बिकीनी घालून सगळ्यांना येड लावणाऱ्या तापसी पन्नूला पुन्हा एकदा अशाच हॉट अदाकारीची ईच्छा झाली आहे. खरे तर तापसीला बॉलिवूडमध्ये चांगले रोल मिळत आहेत. तिच्या वाट्याला आलेले रोल तिने सार्थ करूनही दाखवले आहेत. “नाम शबाना’, “मुल्क’, “पिंक’ आणि “सांड की आंख’ सारख्या सिनेमांना मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता तिला कोणी केवळ आयटम सॉंगसाठी विचारणार नाही, हे निश्चित आहे.
पण उमेदवारीच्या काळात तापसीला अशा आयटम सॉंगसाठी विचारले गेले होते. पण तिने हा प्रस्ताव सपशेल नाकारला होता. दुसऱ्या हिरोईनच्या सिनेमामध्ये आयटम सॉंग करायची आपली तयारी नाही, असे तापसीने स्पष्ट केले आहे. आताही जर आपल्याच एखाद्या सिनेमात आयटम सॉंग करायचे असेल, तर आपली तयारी आहे, असे तिने म्हटले आहे.
याबरोबर सेक्स कॉमेडीमध्ये काम करण्यासही ती अनुकूल नाही. महिलांवरचे आचरट विनोद, द्विअर्थी संवाद आणि त्यातून केलेले विनोद अगदी अभिरुचीहीन असतात. असले मनोरंजन अगदी सवंग असते. त्यामुळे अशा सेक्स कॉमेडीमध्ये आपण कधीही रमणार नाही, असे तापसीने म्हटले आहे.