बिजींग – चीन मध्ये सरकारी मालकीच्या तीन दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी मोबाईल फोनची 5 जी सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू करण्यात त्यांनी अमेरिका आणि अन्य युरोपिय देशांच्या बरोबरीने आघाडी घेतली आहे. अमेरिका, ब्रिटन, आणि दक्षिण कोरियात या तंत्रज्ञानाची सेवा या आधीच सुरू झाली आहे असे बीबीसीच्या वृत्तांत म्हटले आहे.
5 जी सेवा ही सध्याच्या 4 जी मोबाईल सेवेपेक्षा 10 ते 100 पट अधिक वेगवान पद्धतीने डाटा ट्रान्स्फर करणारी सेवा आहे. चायना मोबाईल, चायना युनिकॉम आणि चायना टेलिकॉम या सरकारच्या मालकीच्या तीन कंपन्यांनी संपुर्ण चीन मधील ग्राहकांसाठी काल गुरूवारपासून ही 5 जी सेवा सुरू केली आहे.
त्यामुळे ग्राहकांना आता मोबाईल व इंटरनेट सेवा अत्यंत सुपरफास्ट पद्धतीने वापरता येणार आहे. ही सेवा 4 जी सेवेपेक्षा अधिक स्वस्त देण्याचाही प्रयत्न या कंपन्यांनी केला आहे. चीन मधील 50 शहरांमध्ये 5 जी कमर्शिअल सेवा सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी तेथे मोठ्या प्रमाणात बेस स्टेशन्स सुरू केली आहेत. त्यामुळे ही सेवा सर्व दूर पोहोचण्यास मदत होणार आहे.
या सेवेसाठी या कंपन्यांकडे एक कोटी ग्राहकांनी या आधीच आपली नाव नोंदणी केली होती. येत्या वर्षभरात त्या देशातील 17 कोटी लोक या सेवेचे ग्राहक असतील. अमेरिकेत या सेवेचे सध्या 10 हजार ग्राहक असून दक्षिण कोरियात 5 जीची सध्याची ग्राहक संख्या 75 हजार इतकी आहे. चीनच्या हुआवी कंपनी मार्फत भारतात 5 जी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या मोबाईल कॉंग्रेस मध्ये या चीनी कंपनीला भारत सरकारने भारतात 5 जी सेवेची ट्रायल घेण्यास अनुमती दिली होती. तथापी या कंपनीला भारतात प्रवेश देण्यास अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. ही कंपनी मोबाईल डाटाची हेरगीरी करीत असल्याचा अमेरिकेचा आक्षेप आहे.