संगमनेर – महसूल कर्मचाऱ्यांना महसूलमंत्र्यांचाही धाक नसल्याचे वारंवार दिसून आले. तलाठी धनराज राठोड याला 36 हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. नाशिकच्या लाचपुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तलाठ्याच्यावतीने लाच स्वीकारणाऱ्या खासगी दलालाला रंगेहात पकडल्यानंतर तलाठ्यालाही ताब्यात घेतले आहे.
नाशिक लाचपुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मंगळापूर शिवारात बिगर शेतीक्षेत्र असलेल्या तक्रारदाराने आपल्या वडिलांसह अन्य अकरा जणांच्या नावावर असलेल्या या जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे नोंदविण्यासाठी चिखली सजाचे कामगार तलाठी धनराज नरसिंग राठोड (वय 40,इंदिरा नगर, गल्ली नं.1) याच्याशी संपर्क साधला होता. हे काम करुन देण्याच्या मोबदल्यात लाचखोर तलाठी राठोड याने तक्रारदाराकडून चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 36 हजार रुपये देण्यावर त्यांच्यात एकमत झाले होते.
नाशिक लाचपुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक अजय गरुड व चालक विनोद पवार यांनी संगमनेरात येवून तक्रारदारास लाचखोर तलाठी राठोड याच्याशी संपर्क साधण्यास सांगितला.
यावेळी संबंधित लाचखोराने लाचेची रक्कम घुलेवाडी येथील सह्याद्री मल्टी सर्व्हिसेसचा चालक व तलाठी राठोड याचा खासगी दलाल योगेश विठ्ठल काशीद (वय 33, रा.घुलेवाडी फाटा) याच्याकडे रक्कम देण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचून ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या हातात विशिष्ट पावडर लावलेल्या नोटा दिल्या व त्यांना संबंधित दलाकडे पाठवले.
सदरील लाचेची रक्कम स्वीकारीत असताना वेशांतर करुन दबा धरुन बसलेल्या पोलीस पथकाने दलालाला रंगेहात चतुर्भुज केले. ही रक्कम आपण तलाठी धनराज राठोड याच्यासाठी घेतल्याची कबुलीही त्याने दिली. दोघांवरही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
संगमनेर महसूल कर्मचारी चर्चेत
संगमनेरचे महसूल कर्मचारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. काही तलाठ्यांचे पैसे घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाला तर काही नोंदणी करण्यासाठी बुलेटची रक्कम मागू लागले तसेच एका तलाठ्याने तर वारस नोंदणी लावण्यासाठी पैसे मागितले तर सर्कलनेही अद्यापही त्या नोंदणीची दखल घेतली नाही. कारण त्याला अजून मलिदा मिळाला नसल्याचे खासगीत सांगितले जात आहे.