तैपेई (तैवान) – वादग्रस्त दक्षिण चीन सुद्रात आयोजित केलेल्या नाविक युद्धसरावामध्ये सहभागी होण्यासाठी तैवानने आपली हाय लंग ही पाणबुडी रवाना केली आहे. या युद्धसरावामध्ये सहभागी न होण्याबद्दल चीनने तैवानला धमकी दिली होती. मात्र चीनच्या धमकीला न जुमानता तैवानने आपली पाणबुडी या युद्धसरावामध्ये सहभागी होण्यासाठी पाठवून दिली आहे.
चीनबरोबरचा तणाव वाढलेला असल्यामुळे तैवानवर चीनकडून थेट हल्लाही केला जाऊ शकतो, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तौवानच्या ताब्यातील दोग्शा बेटावर आणि पाश्चात्यांचे नियंत्रण असलेल्या तैपिंगवर चीनकडून हल्ला केला जाऊ शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे.
या बेटांजवळ टेहळणी करण्यासाठी चीनच्या तटरक्षक दलाच्या नौका रवाना झाल्या आहेत. मात्र तरिही तैवानची पाणबुडी दक्षिण चीन समुद्रातील या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी रवाना झाली आहे.
सध्या तैवानकडे नेदरलॅन्डच्या बनावटीच्या दोन पाणबुड्या आहेत. मात्र आता तैवान देशांतर्गतच पाणबुडी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. हाय लंग ही पाणबुडी कोणत्या युद्ध सरावामध्ये सहभागी होणार आहे, याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही.