वालचंदनगर – श्री स्वामी समर्थांचे प्रकट दिन रविवारी (दि. 3) अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी स्वामींचा प्रकट दिन साजरा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. प्रारंभी प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर चोळप्पा महाराजांचे वंशज व मंदीर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी व मंदार
पुजारी यांच्या मंत्रोच्चारात महेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादुकांस पहाटेच्या काकडआरती नंतर देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात येईल. सकाळी साडेदहा वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 144व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पूजन होईल.
सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात येईल. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने
समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरा प्रसाद वाटप करण्यात येईल. तद्नंतर सालाबादप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मूळस्थान) अक्कलकोटच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा होत आहे.