नवी दिल्ली: भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि सध्या पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी गुरूवारी नवी दिल्लीत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी आज माझी भेट घेतली असे ट्विट त्यांनी केले आहे.
कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा “प्रभावी फेरविचार’ करावा, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्या आठवडयात पाकिस्तानला दिले आहेत. व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा ठपका पाकिस्तानवर ठेवत न्यायालयाने कुलभूषण यांना राजनैतिक संपर्काची अनुमती देण्याचे निर्देशही पाकिस्तानला देण्यात आले आहेत.