शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा खतपाणी

योगायोगाने खळबळ; दीपक पवारांना पदाची भेट
सातारा – भाजपच्या बहुचर्चित महाजनादेश यात्रेचा नारळ फुटण्यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात भाजपने पुन्हा धोरणी पावले टाकली आहेत. भाजपचे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार दीपक पवार यांना पश्‍चिम महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाची भेट देत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा खतपाणी घातले आहे.

दीपक पवारांना मिळालेले पद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतींना शिवेंद्रसिंहराजेंनी मारलेली दांडी हा अनोखा राजकीय योगायोग एकाच दिवशी घडल्याने राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. दीपक पवार यांची महामंडळावर लागलेली वर्णी म्हणजे साताऱ्यात भाजपचा विधानसभेचा उमेदवार दमदार असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षापासून राखलेले अंतर आणि मुख्यमंत्र्याशी विकास कामांच्या निमित्ताने वाढवलेली सलगी यामुळे शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाचे सत्र थांबायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांची कराडमध्ये झालेली भेट, तसेच साताऱ्यात महसूलमंत्र्यांशी शिवेंद्रराजेंनी साधलेला संवाद, शरद पवार साताऱ्यात असताना त्यांची टाळलेली भेट नंतर पुण्यात जाऊन त्यांच्याशी केलेले हितगुज या घडामोडीनी शिवेंद्रराजेंच्या मनातील खळबळ प्रकर्षाने चव्हाट्यावर आणली आहे.

सातारा- जावळीत उदयनराजेंच्या इशाऱ्याचे भाजपचे आहिस्ते ‘कदम’ त्यांना कमालीचे जाचत आहेत. उदयनराजे आमच्यासोबत प्रामाणिकपणे काम करणार नाहीत ही भीती त्यांनी थोरल्या पवारांसमोर बोलून दाखवली आहे. पक्षांतर्गत वाद आधी मिटवा ही घुसमट त्यांनी जाहीररित्या सांगितल्याने शिवेंद्रराजेंच्या मनात नक्की काय शिजतयं याचा अंदाज राष्ट्रवादीला येत नसल्याने साताऱ्यात संभ्रम वाढला आहे. अजित पवार यांनी शिवेंद्रराजे आमचेच आहेत, असा दावा केला तरी सगळ्या राजकीय हालचाली राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भाजपच्या पथ्यावर पडल्या आहेत.

आमदारकीचा उमेदवार कोण?

जावळी तालुक्‍यातील दरे गावचे दीपक पवार यांना भाजपने महाराष्ट्र विकास महामंडळाची भेट देत साताऱ्यासाठी दमदार इरादा स्पष्ट केला आहे. दीपक पवार (भाजप) व शिवेंद्रसिंहराजे भोसले (राष्ट्रवादी) यांच्यात 2014 रोजी विधानसभेच्या आखाड्यात लढत झाली होती. त्यात शिवेंद्रराजे साधारण चाळीस हजार मतांनी विजयी झाले होते.

मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी जाऊन डिसेंबर 2016 च्या सातारा पालिका निवडणुकांमध्ये मनोमीलनाचा फुगा फुटला. त्यावेळी आधी जावळीनंतर सातारा मतभेदांच्या राजकारणाने धुमसत राहिले. त्यामुळे सातारा मतदारसंघात खासदार गटाचा पाठिंबा मनापासून मिळेल याचा विश्‍वास शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांना राहिलेला नाही. त्यामुळे शिवेंद्रराजे यांनी भाजपमधून लढावे, असा समर्थकांचा आग्रह होत आहे.

या प्रवेश चर्चेवर शिवेंद्रराजे यांचे थेट भाष्य नसले तरी हालचाली या सूचक आहेत, हे गेल्या पंधरवड्यातील हालचालीवरून दिसून आले आहे. किंबहुना शिवेंद्रराजे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी राजकीय फडाची तयारी झाली असून दीपक पवार यांची महामंडळावर लावण्यात आलेली वर्णी हा त्या तयारीचा भाग आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 220 मिशनमध्ये सातारा व पुणे हे दोन जिल्हे अग्रक्रमाने आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.