यंदाच्या वर्षभरात भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेट खेळताना सूर्यकुमार यादवने धावांचा पाऊसच पडला आहे. त्याने २०२२ मध्ये बऱ्याच विक्रमांना आपल्या नावावर केले आहे. सूर्याला सध्या भारतीय संघाच्या फलंदाजीचा हुकुमी एक्का मानले जात आहे. द.आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांने सूर्यकुमार यादवबाबत मोठं वक्तव्य केले आहे. आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार एबी डिव्हिलियर्स यांच्यासारखी कामगिरी करू शकतो, असे स्टेनने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सकडे मैदानाच्या सर्वच दिशेला मोठे फटाके खेळण्याची क्षमता होती.त्यामुळे त्याला मिस्टर ३६० देखील म्हटले जाते. त्याप्रमाणे डेल स्टेनला वाटते की सूर्यकुमार देखील अशाच प्रकारची फलंदाजी करू शकतो. याचे ताजे उदाहरण नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय टी-२० मालिकेत दिसून आले आहे.
स्टेन म्हणाला की,”सूर्यकुमार कौशल्यपूर्ण खेळाडू आहे आणि मला त्याची खेळण्याची स्टाईल एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देते. त्यामुळे भारताचा एबी डिव्हिलियर्स बानू शकतो. टी-२० विश्वचषकात त्याला त्याचे कौशल्य दाखवण्याची पूर्ण संधी असणार आहे. सूर्यकुमार यादव चेंडूच्या वेगाचा वापर करून त्याचे बरेच शॉट्स विकेटच्या मागे खेळतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यावर चेंडूला वेग आणि उसळी मिळाल्यास सूर्यकुमार त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो.”