मुंबई – शिवसेना पक्षाच्या चिन्हावरून राजकीय वातावरण पेटले असताना त्याला निवडणूक आयोगाने काढलेल्या पर्यायावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली.
यावेळी त्यांनी आपल्या राजकीय जीवनातील सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना पक्षात कार्यरत असताना संस्थेची नोंदणी केली नसल्यामुळे शिवसेना पक्षाला कोणतेही चिन्ह नव्हते. त्यावेळी मशाल हे चिन्ह वापरात आणले होते, असे भुजबळ म्हणाले. शिवसेनेने मशाल या चिन्हावर लढवलेल्या निवडणुकीत पक्षाचा प्रथम महापौर आणि आमदार मी झालो होतो, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे निवडणूक आयोगाने ठाकरे-शिंदे गटात चिन्हावरून साधलेला मध्यबिंदू पाहिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे या गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. त्यामुळे अंधेरी येथील पोटनिवडूक ही उद्धव ठाकरे यांना अजिबात जड जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र ठाकरे – शिंदे गटातील वाद शिवसेना पक्षातील सर्वसामान्य शिवसैनिकाला क्लेष देणारा आहे, असे परखड मत छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर मांडले.