नवी दिल्ली – हत्येचा आरोप असलेला, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. सुशील कुमारवर कुस्तीपटू सागर धनखर यांच्या हत्येचा आरोप आहे. सुशील कुमारला रोहिणी न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. खरं तर, सुशील कुमारच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यावर उपचार करण्यासाठी त्याने रोहिणी कोर्टात एका आठवड्यासाठी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. सुशील कुमार 2 जून 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे.
कुस्तीपटू सुशील कुमारच्या गुडघ्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना गुडघ्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता.
सुशील कुमारला रोहिणी कोर्टातून 23 जुलै ते 30 जुलै दरम्यान अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याची मुदत आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आली होती. जामीन मंजूर करताना न्यायालयाने सुशील कुमार याच्यासोबत दिल्ली पोलिसांचे दोन कर्मचारी असतील, असे आदेश दिले होते. तसेच, सुशील साक्षीदारांवर दबाव आणणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
हत्येच्या आरोपाखाली सुशील 2021 पासून तुरुंगात आहे. मालमत्तेच्या वादात सुशिल कुमारने सागर धनखर, जय भगवान आणि भगत यांच्यावर 4 मे 2021 रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये हल्ला केल्याचा आरोप आहे. धनखरचा नंतर मृत्यू झाला. त्यानंतर सुशील कुमारला अटक करण्यात आली. 12 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित केले होते.