सकारात्मक तोडगा काढण्याचे दिले आश्वासन
मुंबई: मुंबईतील आझाद मैदान इथे मागील सात दिवसापासून मराठा समाजातील तरूण-तरूणींचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२/२०१८ मधील कलम १८ नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी भेट घेतली.
तरूण-तरूणींच्या मागण्या जाणून घेतल्यावर तात्काळ आज संध्याकाळी साडेचार वाजता सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि याचिकाकर्ते व प्रशासनाचे वकील यांच्यासोबत बैठकीचं आयोजन त्यांनी केलं आहे. याबाबत सकारात्मक तोडगा काढू. मुलांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
या बैठकीला आंदोलनातील काही प्रतिनिधीही असणार आहेत. आंदोलनाची दखल सुप्रिया सुळे यांनी घेतल्यामुळे आपल्याला लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास मराठा तरूणांनी व्यक्त केला.