नवी दिल्ली – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गट (Sharad Pawar group) यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता (MLA disqualification) याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक सादर करणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (D Y Chadrachud) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ दोन्ही गटांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र याचिकांवर सुनावणी करणार आहे. आठवडाभराच्या दसऱ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालय पुन्हा सुरू होणार आहे.
17 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पक्षात फूट पडल्यानंतर एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या क्रॉस याचिकांवर निर्णय घेण्यासाठी अंतिम मुदत दिली होती.
खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले होते, तथ्ये दर्शवतात की याचिकांची पहिला संच जून आणि जुलै 2022 पासून प्रलंबित आहे. घटनापीठाचा निकाल 11 मे 2023 रोजी आला होता. आमदार अपात्रता याचिकांवर सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागणार आहे अन्यथा घटनेतील शेड्यूल 10 चा भंग होईल. प्रस्तावित वेळापत्रकामुळे अपात्रतेच्या याचिका वाजवी वेळेत निकाली निघणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंठपीठाने म्हटले होते.