नवी दिल्ली – माजीद अली या स्नूकरपटूने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानचा प्रतिभावान स्नूकरपटूने अशी माजीद यांची ओळख होती. माजीद 28 वर्षांचा होता. त्याने आशियाई अंडर-21 स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. माजिद बऱ्याच दिवसांपासून नैराश्याचा बळी होता आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली, असे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी पंजाबमधील फैसलाबादजवळील समुंदरी गावी माजिदने लाकूड कापण्याचे यंत्र वापरून आत्महत्या केली. माजीदने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तो पाकिस्तानातील अव्वल क्रमांकाचा स्नूकरपटू होता.
एका महिन्यात दुसऱ्या पाकिस्तानी स्नूकर खेळाडूचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानचा दोन वेळचा राष्ट्रीय विजेता मोहम्मद बिलाल याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. बिलाल 38 वर्षांचा होता.
किशोरवयापासूनच डिप्रेशनचा शिकार
माजीदचा भाऊ उमरने सांगितले की, तो किशोरवयापासूनच डिप्रेशनचा बळी होता. त्याच्यावर उपचारही करण्यात आले. “आमच्या कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. आम्हाला माहिती आहे की, तो अस्वस्थ होता, पण तो जीवन संपवेल असे वाटले नव्हते,’ असेही उमरने यावेळी सांगितले.