कैरो – सुदानमधील लष्करी बंडावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठी टीका व्हायला लागली आहे. अशी टीका करणाऱ्या 3 लोकशाहीवादी टीकाकारांना सुदानमधील लष्कराने काल रात्रभरात अटक केली आहे. या टीकाकारांच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. लष्कराच्या बंडाला विरोध करण्यासाठी या टीकाकारांनी सामान्य जनतेला आंदोलनाचे आवाहन केले होते.
त्यानंतर देशभरातील अनेक उद्योग धंदे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सुदानचे अर्थकरण थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. 2019 मध्ये दीर्घकालीन अध्यक्ष ओमर अल बशीर यांच्या हकालपट्टीनंतर सुरू झालेली लोकशाही स्थापनेची प्रक्रिया लष्कराच्या बंडानंतर धोक्यात आली आहे.
नागरिकांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर दगड टाकून वाहतूक रोखून धरली आहे. या आंदोलकांना सुरक्षा रक्षक पिटाळून लावत आहेत. मात्र तरिही आंदोलक पुन्हा अडथळे उभे करत आहेत. पोलिसांनी काही ठिकाणी गोळीबार केला असून त्यात काही आंदोलक जखमी झाले आहेत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
लष्करी बंडानंतर आफ्रिकन युनियनने सुदानला संघटनेतून निलंबित केले आहे. नागरी हंगामी सरकार पुन्हा सत्तेवर येईपर्यंत सुदानचे हे निलंबन कायम राहिल, असे आफ्रिकन युनियनच्या शांतता आणि सुरक्षा परिषदेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सुदानमधील सर्व संबंधितांशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळही पाठवण्यात येणार आहे. मे महिन्यात जागतिक बॅंकेने सुदानमधील पायाभूत सुविधांसाठी 2 अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केली होती. अमेरिकेनेही 1.15 अब्ज डॉरची मदत देऊ केली होती. मात्र आता लष्करी बंडानंतर ही मदत थांबवली गेली आहे.