श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. बारामुल्ला जिल्ह्यात या दहशतवाद्याने लष्कर आणि पोलिसांच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये हा दहशतवादी मारला गेला, असे सुरक्षा दलांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. ठार झालेल्या दहशतवाद्याजवळून एक पिस्तुल, मॅगझीन आणि एक हातबॉम्ब ताब्यात घेण्यात आला आहे.
हा दहशतवादी मूळचा कुलगाम जिल्ह्यातील होता आणि त्याचे नाव जावेद अली वाणी असे होते, असे काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. 20 ऑक्टोबरला ठार झालेला दहशतवादी गुलजार याला बिहारच्या मजूरांची हत्या करण्यासाठी वाणीने मदत केली होती. बारामुल्लामधील दुकानदारांना लक्ष्य करण्याची जबाबदारी वाणीवर सोपवण्यात आली होती.