शिक्रापूर -मित्रांनी एकजुटीने मदत केल्यामुळे करंजेनगर येथील एका कंपनी कामगाराच्या चार वर्षांच्या मुलाची कानाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. यामुळे मित्राला तर आधार मिळालाच पण शस्त्रक्रियेमुळे आवाज कानी पडल्याने चार वर्षांच्या मुलाचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मनोहर नेरकर रांजणगाव येथील कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांचा मुलगा हर्ष कर्णबधीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 8 लाख रुपये खर्च येईल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तेवढे पैसे नसल्याने त्यांनी घर बांधण्यासाठी घेतलेली जागा विकण्याचा निर्णय घेतला.
मात्र, जागा विकूनदेखील इतके पैसे उभे राहणार नव्हते. त्यामुळे मनोहर नेरकर यांनी त्यांच्या मित्रांच्या कानावर ही गोष्ट घातली. सर्व मित्रांनी मिळून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून 1 लाख 25 हजार रुपये गोळा केले. नेरकरांचे मुळ गाव धुळे जिल्ह्यातील असून तिथूनही 70 हजारांची मदत मिळाली. त्यानंतर शिक्रापूर येथील खान्देश मित्र मंडळाने 25 हजारांची मदत केली.
ही सर्व रक्कम आणि नेरकर यांच्या जागेच्या विक्रीतून आलेल्या पैशांतून अखेर हर्षवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी खानदेश मित्र मंडळाचे अनिल देशमुख, सचिन सोनवणे, सुरेश पाटील, योगेश सैदाने, अनिल सिसोदिया, गणेश गिरासे, गौरव मराठे, दीपक गिरासे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.