मुंबई – दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक असून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मुंबईतील दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देखील या मेळाव्यासाठी शुभेच्छा देणारे बॅनर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा वांद्रे कुर्ला संकुलात अर्थात बीकेसीमध्ये होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थासाठी दोन्ही गट आमनेसामने आले होते. हा वाद कोर्टातही पोहोचला होता. अखेर हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. आता मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.
दसरा मेळाव्याकरता शिवसेनेच्या शाखांची तयारी पूर्ण झाली आहे. विशेषत: दादर, प्रभादेवीमधील शिवसेनेच्या शाखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी शिवसेनेचे पदाधिकारीही घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनाही पदाधिकाऱ्यांकडून शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत. दसरा मेळावा शिंदे गटापेक्षा मोठा व्हावा यासाठी आता महाविकास आघाडीती मित्रपक्ष असणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील सरसावले आहेत. या मेळाव्याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे अप्रत्यक्षरीत्या ठाकरे गटाला मदत करणार असल्याची माहिती आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे बॅनर्स पाहायला मिळत आहेत.