पिंपरी: “त्या’ लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी अनेकांची ‘धडपड’

राजकीय, प्रशासकीय व्यक्तींकडून पाठबळ देण्याचा दुर्दैवी प्रकार

पिंपरी (प्रतिनिधी):  बॅंक खात्यावर “लाचेची’ भ्रष्ट रक्कम स्विकारल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतरही “त्या’ अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी राजकीय व्यक्तींसोबतच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती आता धडपड करू लागल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. तक्रारदार नगरसेवकांवर दबाव आणतानाच या प्रकरणातून संबंधितांना कसे वाचवायचे, यासाठी महापालिका वर्तुळात आडाखे रंगू लागल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश “दैनिक प्रभात’ने पुराव्यासह केला होता. यानंतर नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा संपूर्ण प्रकार उजेडात आणून पुरावेही सभागृहासमोर सादर केले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चौकशी समितीची घोषणा केली होती. आजपर्यंतचा अनुभव पाहता सभागृहात उपस्थित केलेले मुद्दे सभागृहाबाहेर “सेट’ होतील या भ्रमात असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटल्यामुळे या अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आता आपले राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीच्या जिल्ह्याबाहेरील एका खासदाराने हा आमच्या गावाकडचा असल्याने त्याला “वाचवा’ अशा सूचना केल्यामुळे राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांची धडपड सुरू झाली आहे. तर भविष्यातील कामे मार्गी लावण्यासाठी भाजपातील काही जणांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांमार्फत संबधित नगरसेवकावर राजकीय दबावाचे तंत्र वापरण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. एका बाजूला राजकीय व्यक्ती कामाला लागलेल्या असतानाच “लाचखोर’ प्रकरणात महापालिकेतील आणखी एक वरिष्ठ अधिकारीही अडकणार असल्याने त्याला वाचविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली तीव्र झाल्याचे समोर आले आहे.

भ्रष्टाचाराला विरोध करण्याचा आव आणणारे दोन्ही पक्षाचे नेतेच आता भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी धडपड करू लागल्यामुळे शहरवासियांमध्येही संतापजनक प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर काही जणांनी या लाचखोरांना वाचविले तर न्यायालयात जाण्याची तयारीही सुरू झाल्यामुळे हे अधिकारी वाचविले जाणार की त्यांनी केलेल्या “भ्रष्ट’ कारभाराचे प्रायश्‍चित त्यांना मिळणार हे लवकरच समोर येणार आहे. मात्र या दुर्दैवी प्रकाराची निंदा सर्व स्तरातून होऊ लागली आहे.


कामठे यांनी सादर केले पुरावे

महापालिका आयुक्तांनी सभागृहात जाहीर केल्याप्रमाणे भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्तांना पुरावे सादर केले आहेत. ज्या ठेकेदाराकडून महापालिका अधिकाऱ्यांनी “भ्रष्ट’ रक्कम स्विकारली त्या ठेकेदाराचे आयकर विवरणपत्रच पुरावा म्हणून सादर केले आहे. या शिवाय तब्बल दहा मुद्दे उपस्थित करीत या संपूर्ण प्रकाराची नि:ष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच राज्य शासनातून सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, असेही त्यांनी पुराव्यांसोबत जोडलेल्या पत्रात नमूद केले आहे. आता आयुक्त ही चौकशी किती गतीने सुरू करतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.