बिबवेवाडी, (हर्षद कटारिया) – महापालिका निवडणुकीची तयारी प्रभाग क्र. 1 ते 58 मध्ये सुरू झाली आहे. यात विद्यमान नगरसेवकांनी आपल्या जुन्या-नव्या प्रभागात विकासकामांची उद्घाटने आणि योजनांच्या भूमिपूजनाची कुदळ मारण्यास सुरूवात केली आहे. काही प्रबळ इच्छुक उमेदवारांकडूनही आरक्षणाचा अंदाज बांधत स्वखर्चातून कामांचे नारळ फोडले जात आहेत. यातून महापालिका निवडणूक जवळ आल्याची जाणीव आता नागरिकांनाही झाली आहे.
महापालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्याच्या सुरूवातीला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दि. 2 मार्चला प्रारूप प्रभागांबाबतच्या हरकती आणि सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे. त्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणुकीची पुढील प्रक्रियेचा अंदाज घेता प्रचारासाठी खूपच कमी दिवस हाती राहणार आहेत, याच कारणातून आपल्या जुन्या-नव्या प्रभागातील मतदारांची यादी लक्षात घेत मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. यासाठी प्रभागाच्या नव्या भागातील नागरिकांसाठी विकासकामांची घोषणा करीत अशा योजनांचे भूमिपूजन कले जात आहेत. प्रभागाच्या नव्या भागात आपली “व्होट बॅंक’ तयार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवक ते इच्छुकांकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये नव्याने निवडणूक रिंगणात उतरणार असणाऱ्या इच्छुकही मागे नाहीत. याच कारणातून प्रत्येक प्रभागात सध्या नवनवीन विकासकामे सुरू झाल्याचे चित्र आहे. ही कामे रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेजलाइन अशा मूलभूत गरजा संबंधीत असली तरी ती या निमित्ताने पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
राजकीय पक्षांकडून धडाका…
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. पालिकेवर भाजपची सत्ता असल्याने त्यांच्याकडून विकासकामांचा गाजावाजा केला आहे तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपाला तोडीस तोड उत्तर देत आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे प्रभागांत या दोन पक्षांकडून विकासकामांचा सर्वाधिक धडाका केलेला दिसतो. तर, त्यानंतर कॉंग्रेस शिवसेना, मनसे या पक्षाकडून निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या आजी-माजींनीही अनेक प्रभागात भूमिपुजने उरकली आहेत. यामध्ये आरपीआय, आप हे पक्षही मागे नाहीत. .