जळोची, (वार्ताहर) – पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह इतर कार्यक्रमांचे 2 व 3 मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले असून यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणेने काटेकोर नियोजन करुन समन्वयाने कामे करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथील सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
नावडकर म्हणाले, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणार्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’सह इतर कार्यक्रमांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांच्या प्रमुख उपस्थितीत 2 व 3 मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करावे.
मेळाव्याकरिता कार्यक्रम पत्रिका, बंदिस्त दालन, विविध स्टॉल्स, पिण्याचे पाणी, कार्यक्रमस्थळी स्वच्छतेच्या सुविधा, वाहनतळ, अल्पोपहार, बैठक व्यवस्था, निवास व्यवस्था, वैद्यकीय पथक, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर, विद्युत, वैद्यकीय पथक, सुरक्षा व्यवस्था आदी सुविधेबाबत आढावा घेण्यात आला. त्या अनुषंगाने उत्तम व्यवस्था करावी, असे निर्देश श्री. नावडकर यांनी दिले. यावेळी सर्व संबंधित अधिकार्यांनी कार्यक्रमाच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने करण्यात येणार्या नियोजनबाबत माहिती दिली.