अहमदनगर – काल (रविवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अल्पवयीन मुलींची छेडछाड काढून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना तिसगाव येथे घडली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. छेडछाड करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आज (सोमवार) तिसगाव ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
हिंदुत्ववादी संघटनांसह नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दोन समाजामध्ये जातीय तणाव निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तिसगावमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दिवसभर तैनात होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनुमान टाकळी गावातील दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी तिसगावच्या बसस्थानकावर उभ्या होत्या. त्या वेळी आरोपी रफिक ऊर्फ लाल्या मुनीर पठाण याने मुलीची छेड काढून त्यांना मारहाण केली, तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ज्यांना ज्यांना माहिती मिळाली तशी तिसगावच्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक कौशल्यरामनिरंजन वाघ पोलीस फौजफाट्यासह तिसगाव येथे दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. जनभावना लक्षात घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देत वातावरण शांत केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणामुळे तिसगाव शहरात काही काळ वातावरण चिघळले होते. पोलीस अधिकारी व ग्रामपंचायतीचे सत्ताधारी गटातील व्यक्तींची शाब्दिक बाचाबाची झाली. या आरोपीने अनेक गुन्हे केले असून, त्याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वी आरोपीने मुलीची छेड काढली होती त्यावेळी स्थानिक पातळीवर तो वाद मिटवण्यात आला होता.
आरोपीवर कठोर कारवाई करावी व छेडछाडीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना व तिसगावच्या नागरिकांनी सोमवारी तिसगाव बंदची हाक दिली. व्यापाऱ्यांनी व शहरवासीयांनी सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिसगाव पेठेतून फेरी काढत निषेध नोंदवला. पोलिसांना निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. सोमवारी दिवसभर तिसगाव शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक परमेश्वर कायंदे, सहायक पोलीस निरीक्षक कौशल्य निरंजन वाघ, गोपनीय शाखेचे भगवान सानप यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज फाटा दिवसभर तिसगाव शहरात तळ ठोकून होता.