ढाका- बांगलादेशात रविवारी चक्रीवादळ बुलबुल मुुळे दोन लोक ठार झाले. बांगलादेशच्या दक्षिण किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसल्यामुळे 21 लाखांहून अधिक लोकांना सखल भागातून बाहेर काढण्यात आले. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागातील सर्व मच्छिमार बोटी आणि ट्रॉलर्ससह अंतर्गत नदीच्या मार्गांमधील प्रवासी नौकांच्या हालचाली तात्पुरत्या थांबवण्याचे आदेश बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत.
दक्षिण पश्चिमेकडील पटौआखालीमध्ये अंगावर झाड पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. तर खुलाअ येथेही अशाच एका घटनेत एका अन्य व्यक्तीचा मृत्यू झाला. चक्रिवादळामुले शेकडो घरांचे आणि शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र चक्रिवादळामुळे जेवढे नुकसान होण्याचा अंदाज होता, त्यापेक्षाही हे नुकसान कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चक्रीवादळ कमकुवत झाले आणि भारतातील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचा नैऋत्येकडील खुलना किनारपट्टी ओलांडू लागल्याचे बांगलादेशच्या हवामान विभागाने रविवारच्या विशेष बातमीपत्रात म्हटले आहे.