मुंबई – देशातील बहुतांश भागातील निर्बंधात बरीच शिथिलता आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामकाज झपाट्याने पूर्व पदावर येऊ लागले आहे. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी चालूच आहे. परिणामी निर्देशांक उच्चांकी पातळीवर असूनही त्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी शेअर बाजारात खरेदी मंद होती. मात्र नंतर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 81 अंकांनी म्हणजे 0.52 टक्क्यांनी वाढून 15,751 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 228 अंकांनी म्हणजे 0. 44 टक्क्यांनी वाढून 52,328 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, टिसीएस,आयसीआयसीआय बॅंक या मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेल्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला. त्याचबरोबर पावर ग्रिड, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा या कंपन्या तेजीत राहिल्या. तर विक्रीचा मारा बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, एचडीएफसी आणि डॉ रेड्डी या कंपन्यांना सहन करावा लागला.
रिलायन्स सिक्युरिटीज संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, करोनाचे रुग्ण कमी होत आहेत. त्याचबरोबर निर्बंध कमी होत असल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. धातू, औषधी या क्षेत्रांना नफेखोरीचा सामना करावा लागला असला तरी खासगी बॅंका, वाहन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. रुपयाच्या मूल्यात आज 19 पैशांची वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना चांगला आधार मिळाला.
बाजारातील कामकाजाबाबत अँजेल ब्रोकिंगचे वरिष्ठ विश्लेषक रूचीत जैन यांनी सांगितले की, निफ्टी सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारानी कंपन्या पाहून खरेदी करावी. निफ्टीला वरच्या पातळीवर 15,770 वर विरोध होऊ शकतो तर खालच्या पातळीवर 15,675 वर आधार आहे.
छोट्या कंपन्या तेजीत –
निर्देशांक उच्चांकी पातळीवर असल्यामूळे मोठ्या कंपन्यांचे शेअर सध्या महाग आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या छोट्या कंपन्यांच्या शेअरची जास्त खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्य निर्देशांकापेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1.38 टक्क्यापर्यत वाढले.
छोट्या कंपन्यांनी चौथ्या तिमाहीत चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामुळे आगामी काळात निर्बंध उठविल्यानंतर या कंपन्या अधिक लाभांश देतील असे गुंतवणूकदारांना वाटते. आशियाई बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश आले मात्र युरोपीयन शेअर बाजाराचे निर्देशांक व काही प्रमाणात कमी पातळीवर होते.