मुंबई – सन 2020 च्या मध्यापासून शेअर बाजार निर्देशांक वाढले आहेत. मात्र विविध परिस्थितीजन्य कारणामुळे आगामी काळात निर्देशांकाची वाटचाल मंद राहण्याची शक्यता बॅंक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज इंडिया या संस्थेच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
डिसेंबरपर्यंत मुख्य निर्देशांक फार तर नऊ टक्क्यांनी वाढतील. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 19,100 अंकापर्यंत पर्यंत वाढेल असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. जून 2020 पासून ऑक्टोबर 2019 पर्यंत ज्या वेगाने निर्देशांक वाढले, तो वेग आता राहणार नसल्याचे अहवालाचे लेखक अमिश शाह यांना वाटते. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत. अशी परिस्थिती असली तरी अजूनही भारतीय शेअर बाजारातून मिळत असलेला परतावा इतरांपेक्षा जास्त आहे.
यामध्ये फक्त तैवान हा देश भारताच्या पुढे आहे. निर्देशांक वेगात का वाढणार नाहीत याची कारणमीमांसा करताना अहवालात म्हटले आहे की, रिझर्व बॅंक भांडवल सुलभता कमी करणार आहे. भारतासह विविध देशात महागाई वाढणार आहे. डॉलर बळकट होण्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होणार आहे. या कारणामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकांवर दबाव राहील.
जूनपासून प्रत्येक तिमाहीला फेडरल रिझर्व व्याजदरात पाव टक्क्यांनी वाढ करू शकते. त्यामुळे डॉलर वधारून रुपयाचे मूल्य 77 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत कोसळू शकते.
पुढील सहा महिन्यांत क्रुडच्या किमती 120 हॉलरपर्यंत वाढू शकतात. त्यानंतर त्या कमी होऊन 85 डॉलरवर स्थिरावतील या सर्व घडामोडीचा भारतीय शेअर बाजार निर्देशांकावर परिणाम होईल. सरकारची निर्गुंतवणूक निर्देशांकांना आधार देईल. त्याचबरोबर जी क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुली केली जातील त्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वाढतील. या वर्षीत भारताचा विकास दर 9.3 टक्के राहील तर पुढील वर्षी तो 8.3 टक्के राहील असे या संस्थेला वाटते.