नवी दिल्ली – महामार्गावरील टोलचा दर घाऊक महागाई निर्देशांकाशी निगडित असतो. सध्या महागाई निर्देशांक तब्बल 13 टक्क्यांवर असल्यामुळे आगामी काळात टोलचा दर वाढेल.
त्याचबरोबर अर्थव्यवस्था वेग घेत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूकही वाढेल. त्यामुळे टोल संकलन मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे ईक्रा या संस्थेने म्हटले आहे.
2022-23 मध्ये टोलची रक्कम साधारणपणे 14 ते 15 टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. रस्ते निर्मितीसाठी सध्याची परिस्थिती जास्त पूरक आहे. कारण एकीकडे अर्थव्यवस्था वाढत असल्यामुळे रहदारी वाढत आहे आणि दुसरीकडे घाऊक महागाई निर्देशांक वाढत असल्यामुळे टोलचा दरही वाढणार आहे.
त्यामुळे रस्ते निर्माण करणारे आणि रस्त्याची देखभाल करणाऱ्या कंपन्यांच्या ताळेबंदामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. सध्या घाऊक महागाई निर्देशांक 13 टक्के आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हा निर्देशांक केवळ दोन टक्के इतका होता.