Entertainment : अभिनेता आमिर खानची (Amir Khan) लेक आयरा खानची (Ira Khan) मागील काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. आयरा आणि तिचा होणारा पती नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यावेळी केवळ निवडक पाहुण्या मंडळींच्या उपस्थितीत आमिर खानच्या लेकीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता ही जोडी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर नुपूर आणि आयराच्या लग्नापूर्वीच्या विधींचे काही फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये आयरा आणि नुपूर एकत्र दिसत आहेत. त्या फोटोमध्ये आयराचा मराठमोळा लूक दिसून येतो आहे तर नुपूरने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. आयराच्या या कार्यक्रमात दोघांच्याही घरचे नातेवाईक उपस्थित होते. याचा व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आयरा आणि नुपूर ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ ?
आयरा आणि नुपूर यांचे लग्न जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. आयरा आणि नुपूर 3 जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यानंतर उदयपूर याठिकाणी दोघांचं शाही थाटात लग्न होणार आहे. लग्नानंतर आमिर याने मुंबईत रिसेप्शन पार्टीचं देखील आयोजन केलं आहे. 13 जानेवारी रोजी मुंबईमध्ये मोठी पार्टी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयराच्या विवाहबाबत आमिर खान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. “आयराने नुपूर सारख्या मुलाची निवड केली म्हणून मी आनंदी आहे. नुपूर, आयरा हिला कायम आनंदी ठेवेल. तो माझ्यासाठी जावई नाही तर, माझा मुलगा आहे.. हा फिल्मी डायलॉग आहे. पण हेच सत्य आहे. मी प्रचंड भावुक झालो आहे. लेकीच्या पाठवणीच्या वेळी मी प्रचंड रडेल,” असे आमिर खान एका मुलाखतीत म्हणाला होता.