सातारा (प्रतिनिधी) – सातारा येथील औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही जुनी आणि महत्त्वाची कंपनी आहे. सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या या कंपनीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही झाली होती; परंतु या कंपनीचे कामकाज सध्या बंद आहे.
साताऱ्यातील उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीची निकड पाहता, महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. बजाज उद्योग समूहामार्फत इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांची निर्मिती करण्यात येत असल्याचे समजले आहे. ही आनंददायी व स्वागतार्ह बाब आहे.
इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांचे उत्पादन सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या प्लॅंटमध्ये सुरू केल्यास ही कंपनी पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल. अनेकांना रोजगार मिळेल. शेतकऱ्यांचा स्वयंरोजगाराचा उद्देशही सफल होईल. याबाबत बजाज उद्योग समूहाने सकारात्मक विचार करावा. दुचाकी निर्मितीचा साताऱ्यातील प्लॅंट पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राजीव बजाज यांच्याकडे केली आहे.
याबाबत आ. शिवेंद्रराजे यांनी बजाज यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्लॅंट बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असलेले अनेक लहान-मोठे उद्योग सध्या बंद आहेत. कंपनीतील हजारो कामगारांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे बेरोजगारीची समस्या जटील बनली आहे.
ही कंपनी पुन्हा सुरू झाल्यास त्यावर अवलंबून असणारे लहान-मोठे उद्योग सुरू होतील. हजारो हातांना रोजगार मिळून साताऱ्यातील औद्योगिकीकरणास आणखी चालना मिळेल. बेरोजगारी नष्ट होऊन संबंधित उद्योगांशी निगडीत कुुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. आपल्या उद्योग समूहाने इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांच्या निर्मितीस सुरुवात केल्याचे समजले. त्यामुळेच सातारा येथील प्लॅंटमध्ये अशा दुचाकी वाहनांचे उत्पादन करण्यासाठी ही कंपनी पुन्हा सुरू करावी.
सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने इथेनॉलची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करत आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांनाही चांगला ऊसदर मिळत आहे. सातारा औद्योगिक वसाहतीतील नामांकित आणि प्रथितयश कंपनी म्हणून महाराष्ट्र स्कूटर्सचा नावलौकिक आहे. साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्राला उर्जितावस्ता मिळण्यासाठी ही कंपनी पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. याबाबत आपण तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. सातारा येथील प्लॅंट पुन्हा सुरू करावा.