हिंगोली – वसमत एसटी आगारातील चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. अशोक दगडू कळंबे असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. ते जानेवारी महिन्यात एसटी आंदोलन काळात बडतर्फ झाले होते.
अशोक कळंबे हे मागील काही वर्षापासून वसमत आगारामध्ये एसटी चालक म्हणून कार्यरत होते. वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय जवळ ते कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी रात्री कळंबे घरी आले त्यावेळी ते फोनवर कोणाशीतरी जोरजोरात बोलत होते. रागाच्या भरात त्यांनी मोबाईलही फोडला. कुटुंबीयांनी त्यांना विचारणा केली मात्र त्यांनी काही उत्तर दिले नाही. त्यानंतर काही वेळातच त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये जावून ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.