कोणत्याही बांधकामाधीन स्थितीतील प्रकल्पात गृहखरेदी करण्यामध्ये ही जोखीम असतेच. उदा. नैसर्गिक आपत्ती किंवा चोरीमुळे होणारे नुकसान किंवा प्रकल्पामुळे थर्ड पार्टीचे होणारे नुकसान या गोष्टी अचानक घडू शकतात. या कारणांमुळे नुकसान होवो किंवा न होवो कंत्राटदाराची रक्कम ही काही काळ अडकते. अशा घटनांमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी विमा कंपन्यांनी कंत्राटी कंपनी किंवा कंत्राटदारासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण विमा योजना आणली आहे. या विमा योजनेचा लाभ कोणताही कंत्राटदार किंवा कंत्राटदार कंपनी घेऊ शकतो.
सर्व बांधकामाच्या कामात किंवा बांधकामस्थळी महाकाय यंत्रे, वाळू, सिमेंट, लोखंड आदी सामग्रीचे भांडार असतो. या गोष्टी चोरीला गेल्या तर त्याची भरपाई कशी करायची हे ठाऊक असेलच असे नाही. जनरल इन्शूरन्स कंपनीने बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कंपन्या आणि कंत्राटदाराला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी विमा पॉलिसी आणली आहे. याशिवाय मशिन किंवा अन्य वस्तुंमुळे थर्ड पार्टीचे होणारे नुकसान भरून देण्यासाठी विमा कंपन्यांनी आणखी काही पॉलिसी आणल्या आहेत.
कोणत्या विमा योजना?
बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कंपन्या आणि कंत्राटदारांसाठी विमा कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क इन्शूरन्स नावाची योजना आणली आहे. या विमा योजनेचे कवच हे मूळत: दोन भागात विभागले आहे. पहिला भाग म्हणजे बांधकाम स्थितीतील योजनेमुळे होणारे नुकसान आणि दुसऱ्या भागात बांधकाम अवस्थेतील असलेल्या योजनेमुळे तिसरे पक्ष म्हणजे थर्ड पार्टीला होणारे नुकसान.
कोणती जोखीम समाविष्ट आहे?
या विमा योजनेनुसार गृहप्रकल्प, शासकीय कार्यालय भवन, रुग्णालय, शाळा, थिएटर्स, रस्ते, रेल्वेचे पूल, भूसुंरुग स्फोटाचे काम, विमानतळ, धरणे, विहीर आदी योजनांना नैसर्गिक आपत्ती, अपघात आणि चोरी झाल्याने होणाऱ्या संभाव्य नुकसानीला विमा कवच दिले आहे. या योजनेनुसार बांधकाम कंपनी किंवा कंत्राटदार हे आपल्या कामगारांना विमा कवच देखील देऊ शकतात.
दावा कसा करता येतो?
अन्य विमा योजनेपेक्षा कॉन्ट्रेक्टर्स ऑल रिस्क इन्शूरन्स ही वेगळी विमा योजना आहे. ही एक वैशिष्टयेपूर्ण विमा योजना असून त्यात उच्च प्रतीच्या जोखीम गृहित धरण्यात आली असून बांधकाम स्थितीतील प्रकल्पासाठी काही नियम निश्चित केले आहेत. काही संभाव्य धोक्याचे आकलन कंत्राटदार आणि प्रोजेक्ट मालकाला असते. मात्र काही अनाकलनीय घटना घडते तेव्हा सर्व आडाखे कोलमडून पडतात. अशावेळी विमा दाव्यासाठी हस्ताक्षर असलेला अर्ज महत्त्वाचा आहे. प्रकल्पासाठी खरेदी केलेली उपकरणे व बांधकाम निर्मिती साहित्याचे बिल आणि डिलिव्हरी याचे विवरण असणे महत्त्वाचे आहे.
कोण खरेदी करू शकतो विमा?
मुख्य कंत्राटदार, ठेकेदार कंपनी अशा प्रकारचा विमा खरेदी करता येतो. प्रकल्पाचे मालक, सब कॉन्ट्रॅक्टर, प्रकल्पाला अर्थसाह्य करणारी कंपनी, बांधकाम करणारी कंपनी आदींना विमा दिला जातो. दुसऱ्या बाजूला विक्रेता म्हणून विमा कंपनी असते आणि ज्यांना बांधकामस्थितीतील प्रकल्पामुळे नुकसान सहन करावे लागते अशा कंपन्या थर्ड पार्टी असतात.
रायडरची सुविधा
अन्य विमा योजनांप्रमाणेच यात रायडरची अतिरिक्त सुविधांची तरतूद आहे. साहजिकच अतिरक्त कवचासाठी मूळ हप्त्याबरोबरच अन्य भरणा देखील करावा लागतो. जादा हप्त्याच्या विमा योजनांत काही राडयर आपोआपच मिळतात.
कशासाठी विमा कवच हवे?
कॉन्ट्रॅक्टर्स ऑल रिस्क इन्शूरन्स ही एक महत्त्वाची विमा योजना आहे. यात लहान घरापासून ते मोठमोठ्या प्रकल्पाला विमा कवच प्रदान केले जाते.