Gautami Tadimalla – दाक्षिणात्य अभिनेत्री गौतमी तडिमल्ला (Gautami Tadimalla) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकला. भ्रमनिरास झाल्याने जड अंत:करणाने त्या पक्षाबरोबरची 25 वर्षांची साथ सोडत असल्याचे त्यांनी म्हटले. ती घडामोड तामीळनाडूत भाजपसाठी आणखी एक हादरा ठरली आहे.
गौतमी यांनी सोशल मीडियावरून निवेदन जारी करून भाजपमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. एका व्यक्तीने पैसे, मालमत्ता यासंदर्भात माझी फसवणूक केली. दुर्दैवाची बाब म्हणजे भाजपमधील काही जण त्या व्यक्तीच्या पाठिशी होते, असा आरोप त्यांनी केला.
मात्र, संबंधित व्यक्तीचा नामोल्लेख त्यांनी केला नाही. तामीळनाडूत 2021 यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन मला देण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी भाजपने त्याविषयीचा निर्णय रद्द केला. त्यानंतरही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिले, असे त्यांनी म्हटले.
तामीळनाडूत भाजप अद्यापही राजकीय प्रभाव पाडू शकलेला नाही. त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकने अलिकडेच भाजपबरोबरची मैत्री तोडली. आता गौतमी यांच्यासारख्या जनमानसात ओळख असलेल्या अभिनेत्रीने त्या पक्षाशी फारकत घेतली आहे.