नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसची महत्वाची बैठक सोमवारी झाली. त्या बैठकीतून पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राज्यसभेवर जाणे जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळाले.
देशातील १५ राज्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत कॉंग्रेस किती उमेदवार रिंगणात उतरवणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र, प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमधून तो पक्ष उमेदवार देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख आहे.
ती जवळ आल्याने कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये सोनिया, के.सी.वेणुगोपाल, अजय माकन, मुकूल वासनिक आदी नेते सहभागी झाले.
पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून बैठकीत सोनिया आणि माकन यांच्याही नावांची चर्चा झाल्याचे समजते. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या हिमाचलमधून राज्यसभेवर १ जागा निवडून दिली जाणार आहे. त्या जागेसाठी प्रामुख्याने सोनियांच्या नावाचा विचार झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.