सतीश काकडे : उच्चांकी दर दिल्याने माळेगावचा सत्कार करणार
वाघळवाडी- राज्यात उच्चांकी दर दिल्याने माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाचा सत्कार शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी माळेगाव कारखान्यांप्रमाणे सोमेश्वर कारखान्याने विनाकपात 3450 रुपये प्रति.मे टन अंतिम ऊसदर दिल्यास त्यांचाही सत्कार करण्याची कृती समितीचा मानस असल्याचे शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी सांगितले.
सतीश काकडे म्हणाले की, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने हंगाम 2018-19 चा अंतिम ऊस दर 3 हजार 300 रुपये प्रती मे.टन जाहीर केला आहे. त्यामध्ये 150 रुपये प्रति मे.टन कपात करणार असल्याची माहिती दिली जी अत्यंत चुकीचे आहे. वास्तविक गेल्या दोन वर्षांत सभासदांना माळेगाव कारखान्यापेक्षा जादा दर न देता 44 कोटी निधी तयार करून ठेवला की ज्या निधीचा सभासदांना गेले दोन वर्षांत वैयक्तिकरित्या काही फायदा झाला नाही. अध्यक्षांनी या दोन वर्षांत शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामगार कॉलनी याचे केवळ भूमिपूजन करून घेतले; परंतु विट देखील न लावल्यामुळे कारखाना अध्यक्षांची यांची कार्यक्षमता दिसून दिसते.
केवळ संरक्षक भिंत बांधकामे व कारखान्यातील अनावश्यक कामाची गरज नसताना केवळ स्वतःच्या हेतू साध्य करण्यासाठी या कामांना अग्रक्रम दिला तरी ऊस दर जादा मिळण्यासाठी गतवर्षी 20 कोटी रुपये किंमत चढउतार निधी सभासदांनी मंजूर देऊन काढून ठेवला आहे. त्यातून हंगाम 2018-19 च्या अंतिम ऊसदर किमान 150 रुपये प्रति.मे टन वाढ करुन व जे 150 रुपये प्रति. मे टन कपात करण्याचे संचालक मंडळाने ठरवले आहे तसे न करता विनाकपात 3450 रुपये प्रति.मे टन अंतिम भाव जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.