बारामती – करोना मुक्त होऊन आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचे बारामतीत फटाक्यांची आतषबाजी तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
शहरातील सात करोना संक्रमित रुग्णांपैकी एका ज्येष्ठ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरातील पहिला करोना संक्रमित ठरलेला रिक्षाचालक रुग्ण यापूर्वी करोनामुक्त झाला आहे. त्यामुळे शहरात एकच करोना संक्रमित रुग्ण असून त्याच्यावर पुणे येथील औंध रुग्णालयात उपचार सुरू आहेत
. शहरात केवळ एकच रुग्ण उरल्याने बारामती शहर करोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. शहरात अवलंबण्यात आलेला भिलवाडा तसेच बारामती पॅटर्न यशस्वी होताना दिसत आहे. बारामती शहरातील श्रमिक नगर येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर समर्थ नगर येथे पाच तसेच म्हाडा कॉलनी येथे एक रुग्ण सापडला. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या सात एवढी झाली होती. मात्र भिलवाडा तसेच बारामती पॅटर्ननुसार बारामती शहर सीलबंद करण्यात आले.
नागरिकांना घरपोच अत्यावश्यक जीवनावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली राहिली. गुरुवारी (दि. 23) बारामती शहरातील एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अहवाल निगेटीव्ह आला. यानंतर घरी आलेल्या या कुटुंबाचे उपनगराध्यक्षा तरन्नुम अल्ताफ सय्यद यांनी जोरदार स्वागत केले. फटाके वाजवत व फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर देखील आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी मुस्लिम बॅंकेचे संचालक अल्ताफ सय्यद, स्वयंसेवक गणेश कदम, नितीन भागवत, ओंकार राऊत, योगेश गायकवाड, मेहबूब सय्यद आदी उपस्थित होते. बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी तरी बारामतीकरांनी हुरळून न जाता भिलवाडा व बारामती पॅटर्ननुसार घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.