कुरकुंभ- दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील ऑनर लॅब कंपनीचा रासायनिक प्रक्रिया केल्यानंतरचा घातक घनकचरा चक्क रस्त्यावर पडला, हा घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (एमएच ११ ए.एल.३४५८) मागील फाळके तुटल्याने अक्षरशः घनकचरा हा रस्त्यावर सांडला होता, एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यावर हा घनकचरा पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. ही बाब संबंधित कंपनीस समजतास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांकडून हा धोकादायक घनकचरा उचलण्यात आला.
केमिकल कंपन्यांमधील रासायनिक प्रक्रिया केल्यानंतरचा घनकचरा हा रांजणगाव या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाठविला जातो, हा घनकचरा बंद ट्रकमध्ये पाठवण्यात येतो. मात्र, कुरकुंभ या ठिकाणी ऑनर लॅब कंपनीचा हा घनकचरा कंपनीच्या काही अंतरावरच उघड्या ट्रकमधून घेऊन जात असताना ही घटना घडली.
त्यामुळे एमआयडीसी चौकापर्यंत उघड्यावर हा घनकचरा पडला होता. रस्त्यावरून जरी हा घनकचरा उचलला असला तरी काही कामगार रस्त्यावरून चालत जात असताना पायाला लागून कामगार, नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. यामुळे संबंधित कंपनी प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
सूर्यकांत शिंदे, अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे. -कुरकुंभ एमआयडीसी मधील ऑनर लॅब या कंपनीतील रासायनिक प्रक्रिया केल्यानंतरच्या घनकचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मागील फाळके तुटल्याने हा अपघात झाला व रस्त्यावर हा घनकचरा सांडला,सदर कंपनीच्या अधिकाऱ्यास हा कचरा उचलण्यास सांगितले आहे.