मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा येथील गोवर्धन परिसरातील ईदगाह मशीदीत चार तरुणांनी हनुमान चालीसाचे पठण केल्याची माहिती समोर आली आहे. आज (मंगळवार) सकाळी मशीदीत केलेल्या हनुमान चालीसा पठणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर पोलीसांनी त्या चार तरूणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ लंबरदार, राघव मित्तल, कान्हा आणि कृष्णा ठाकुर (सर्व राहणार गोवर्धन परिसर, मथुरा) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. भाईचारा वाढवण्यासाठी आम्ही मशीदीत हनुमान चालीसा पठण केले, असे या तरूणांनी म्हटले आहे.
मथुरा ठिकाण हे हिंदू-मुस्लिम सौहार्दाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी कोणत्याही समाजातील व्यक्तींना शांती भंग होईल असे कृत्य करण्याची परवाणगी दिली जाणार नाही. शांती भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डाॅ. गौरव ग्रोवर यांनी सांगतिले आहे.
दरम्यान, 29 ऑक्टोबर रोजी मथुरेतील नंद बाबा मंदिरात चार जण आले होते. त्यातील दोन जणांनी मंदिरातील सेवकांची दिशाभूल करून मंदिर परिसरात नमाज पठण केल्याची घडना घडली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आले होते.