पुणे – सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसाठी आता वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन व सहकार आयुक्तालयाने यासाठी “सहकार संवाद’ या नवीन संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. सभासदांनी आपल्या समस्या घरबसल्या या संकेतस्थळावर मांडल्यास ठराविक कालावधीमध्ये त्याचे निराकरण होईल. तसेच कोणत्या विभागाकडे किती तक्रारी आल्या, त्याचे निराकरण किती दिवसांत झाले, यावर सहकार आयुक्तालयाकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
राज्यात सुमारे एक लाख पंधरा हजार नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यात राहणाऱ्या सभासदांची संख्या सुमारे पंधरा लाखांच्या आसपास आहे. या सभासदांना किंवा अध्यक्षांना महापालिका, महावितरण, पोलिस किंवा सभासदांमधील अंतर्गत वाद, अशा तक्रारी सहकार विभागाकडे कराव्या लागतात. मात्र, पोलिसांशी संबंधित तक्रार असल्यास ती सहकार आयुक्तालयात स्वीकारली जात नाही. त्याच पद्धतीने सहकार विभागातील तक्रार पोलिसांकडे देऊन चालत नाही. महापालिकेची संबंधित, महावितरणशी संबंधित तक्रारी त्या त्या विभागाकडेच कराव्या लागतात. त्यामुळे सभासदांना किंवा अध्यक्षांना या विभागांमध्ये चकरा माराव्या लागतात.
सोसायटीपासून दूरच्या भागात असलेल्या अशा कार्यालयांमध्ये जाण्यासाठी ज्येष्ठ सभासदांना तसेच अध्यक्षांना मोठा वेळ लागतो. तक्रारी संदर्भात पाठपुरावा करणे प्रत्येक सभासदाला किंवा अध्यक्षांना वेळोवेळी शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणूनच महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन व सहकार आयुक्तालयाने तक्रारींच्या निवारणासाठी एका स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. सहकार संवाद या नावाने संकेतस्थळ तयार करण्यास सहकार विभागाचे अतिरिक्त सचिव, सहकार सचिव व सहकार आयुक्तांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
प्रत्येक सभासदाला स्वतंत्र लॉगिन
प्रत्येक सभासदाला तक्रार करताना नोंदणी केल्यानंतर एक स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यात दोनशे शब्दांपर्यंत तक्रार लिहिता येणार आहे. सभासदाने त्याच्या पत्त्यासह पिनकोड क्रमांक टाकल्यानंतर त्या पिनकोडच्या आधारे ही तक्रार संबंधित उपनिबंधकाकडे जाणार आहे. उपनिबंधक स्तरावरून ही तक्रार त्या त्या विभागाकडे दिली जाईल.
प्रत्येक तक्रारीसाठी निवारणाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्या दिवसांत ती तक्रार सोडवली न गेल्यास तक्रारदाराला वरच्या स्तरावर दाद मागता येणार आहे. त्याचप्रमाणे तक्रारीवर संबंधित विभागाकडून उत्तर आल्यानंतर सभासदाचे समाधान न झाल्यास वरिष्ठ स्तरावर तक्रार करता येणार आहे.