– हिमांशू
द्वेषाचा आजार माणसाला नवा नाही आणि तो कोणत्याही अन्य संसर्गजन्य आजारांपेक्षा अधिक घातक आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालंय. जन्मजात श्रेष्ठत्वाचा भंपक अभिमान असो वा जातिधर्मावरून, वंशावरून इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती असो, द्वेषाचा आजार फक्त माणसाच्याच मेंदूत जन्म घेतो आणि पाहता-पाहता त्याचा भस्मासुर होतो, हे जगानं अनेकदा पाहिलंय. लाखो जीवांचं मोल देऊनसुद्धा माणूस माणसाला माणूस म्हणून जवळ करायला तयार नसेल, तर निसर्गालाही आव्हान देऊन माणसाने केलेल्या एवढ्या प्रचंड प्रगतीचा फायदाच काय? आपलं चांद्रयान नुकतंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. क्षणभर कल्पना करा, आपण त्या यानातून प्रवास करीत आहोत आणि हजारो किलोमीटर अंतरावरून आपल्या पृथ्वीकडे पाहत आहोत.
पृथ्वीवर असलेल्या पाण्याच्या तुलनेत जमिनीचं प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे अवकाशातून आपल्याला पाणी आणि जमीन एवढाच फरक कसाबसा दिसतो आहे. या एकमेव ग्रहावर उपलब्ध असलेल्या छोट्याशा जमिनीवर माणसानं आपलं साम्राज्य विस्तारलंय; पण माणूसपण अजूनही विस्तारलेलं नाही. ते इतकं संकुचित राहिलंय, की केवळ वर्णावरून माणसं एकमेकांचा द्वेष करतात. प्रसंगी एकमेकांना ठार मारायला पुढे-मागे बघत नाहीत. काय वाटेल दुरून हे चित्र पाहताना? प्रगतीचे सगळे दावे चुलीत घालणारा हा द्वेषाचा राक्षस केवळ अप्रगत देशांतच नव्हे तर अतिसमृद्ध आणि अतिप्रगत अशा अमेरिकेसारख्या देशातही वारंवार डोकं वर काढत असतो.
33 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत नागरिकांकडे असलेल्या बंदुकांची संख्या आहे 40 कोटी. “प्रत्येक माणसाच्या हाती जेव्हा बंदूक असेल, तेव्हा लोक असुरक्षित होण्याऐवजी उलट अधिक सुरक्षित होतील,’ अशी वेडगळ मखलाशी करणाऱ्या अमेरिकेतील “गन लॉबी’ला रोखणं आजवर तिथल्या राज्यकर्त्यांना शक्य झालेलं नाही. परिणामी द्वेषाचा आजार ज्याला जडला, तो माणसं मारत सुटला. फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनविल शहरात नुकताच एक माथेफिरू गोळीबार करत घुसला. या अंदाधुंद गोळीबारानं तीन व्यक्तींचा बळी घेतला. या तीनही व्यक्ती कृष्णवर्णीय होत्या आणि त्यात एका महिलेचा समावेश होता.
खरेदीसाठी दुकानात गेलेल्या या लोकांना आपला मृत्यू जवळ आलाय, असं मनात तरी आलं असेल का? गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरानं स्वतःवर गोळी झाडली. हल्लेखोर कृष्णवर्णीयांचा द्वेष करत होता आणि हल्ल्यापूर्वी त्यानं केलेल्या काही पोस्ट्समधून ते दिसूनही आलं होतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. हल्ल्यानंतर परिसरातल्या कृष्णवर्णीयांसाठी “हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. म्हणजे, आता त्यांनी जपून राहायचं. जपून घराबाहेर पडायचं. सतत भीतीच्या छायेखाली वावरायचं. घराबाहेर गेलेली व्यक्ती परत येईपर्यंत कुटुंबियांनी चिंतेत राहायचं, असा याचा अर्थ.
2023 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत अशा बेछूट गोळीबाराच्या 469 घटना अमेरिकेत नोंदवल्या गेल्यात. ज्या देशात जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त पाच टक्के लोक राहतात, तिथं जगातल्या एकूण नागरी बंदुकांपैकी 46 टक्के बंदुका आहेत. शस्त्रखरेदीचा आणि बाळगण्याचा अधिकार 1791 मध्ये अमेरिकी नागरिकांना दिला गेला. म्हणजेच, 230 वर्षांपेक्षा अधिक काळ “बंदूक संस्कृती’ तिथं अस्तित्वात आहे. ती संपवण्याचा प्रयत्न नाहीच; उलट द्वेषाची फोडणी सतत मिळत असल्यामुळे ही संस्कृती वाढतच चाललीये.