पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 ऑगस्ट रोजी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल होणार आहे. यासाठी पुण्यात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी विरोधकांकडून काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले आहे.
मंडई परिसरात पुण्यातील संघटनांच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे घेऊन मंडई परिसरात आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये काँग्रेससह अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. पंतप्रधानांनी मणिपूरला जायला हवे होते, त्यांचे पुण्यात काय काम आहे? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बावगे, मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी काही विरोधकांना ताब्यात देखील घेतले आहे.
असा असणार मोदींचा पुणे दौरा –
पंतप्रधान पुणे दौऱ्याची सुरुवात ही दगडूशेठ गणपती दर्शनाने करणार आहेत. सकाळी 11 वाजता मोदी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सकाळी 11.45 वाजता प्रदान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रोला हिरवा कंदील दाखवून विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प-2ला हिरवा झेंडा दाखवून नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रो टप्पा-1च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे.
या प्रकल्पाची पायाभरणी 2016मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणांना जोडणार आहे.