पुणे : कोणत्याही महिलेचे किंवा मुलीचे सौंदर्य हे तिच्या केसांवर जास्त अवलंबून असते असं म्हटलं जातं…पण विचार करा जर महिलेकडे किंवा मुलीकडे केसच नसतील तर…विचार देखील करवत नाही ना…पण आपण या समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून एका चिमुकलीने आपल्या याच सौंदर्याचा त्याग केला आहे. होय, ऋत्विजा मून असे या चिमुकलीचे नाव आहे. ऋत्विजाने एवढं मोठं धाडस हे कॅन्सपीडितांसाठी केले आहे.
ऋत्विजा मून वय वर्ष केवळ 14… पण केसांचा त्याग करण्यासारखी अशक्य वाटणारी गोष्ट तिने शक्य केली आहे. ऋत्विजाने तिचे केस कॅन्सरपीडितांसाठी तयार होणाऱ्या वीगसाठी दान केले आहेत. समाजात कॅन्सरपीडित असणाऱ्या व्यक्ती या विश्वासाने फिरु शकत नाहीत. कारण त्यांचे डोक्यापासून ते भुवयांपर्यंतचे सर्व केस हे कॅन्सरवर उपचारासाठी करण्यात येणाऱ्या किमीओथेरपी दरम्यान जातात… त्यातून समोर आलेल्या त्यांचे रुपाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा असतो. त्यामुळे त्यांना समाजात विश्वासाने फिरता यावे सर्वसामन्यांसारखे जगता यावे यासाठी ऋत्विजाने केस दान करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या केसांचा त्याग इतरांसाठी करणे हे कोणत्याही महिलेला किंवा मुलीसाठी सोपी गोष्ट नाही परंतु, 14 वर्षाच्या ऋत्विजाने हे धाडस करत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सध्या तिच्या या धाडसाचे कौतूक तर होत आहे परंतू, या कौतूकाला भुलून न जाता समाजासाठी मला आणखी खुप काही करायचे आहे असे ऋत्विजाने म्हटले आहे.