वाई -जागतिक महामारी असलेल्या करोनाच्या भीषण संकटकाळातही स्वत:च्या जीवाची पर्वा न करत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या पोलिसांसह पत्रकार तसेच माथाडी कामगारांना वाई तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
करोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत शासकीय सेवकांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून करोना विषाणूवर मात करण्यासाठी जनजागृतीसाठी कशाचीही अपेक्षा न ठेवता सोयीसुविधांअभावी अहोरात्र रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्याचबरोबर शासकीय गोदामात गहू, तांदूळ तालुक्यातील प्रत्येक गावा गावात स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य पोचविण्यासाठी गाड्या भरण्याचे तसेच उतरवण्याचे कष्टाचे काम करणाऱ्या सेवाभावी हमाल बांधव या सर्वांच्या कामाची दखल घेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वाई तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक महाराष्ट्र राज्य मेडिकल असो. अरुण पवार व त्यांचे सर्व सहकारी बांधव यांच्याकडून तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व हमाल बंधूना कोरोना विषाणूच्या बचावासाठी मास्क, हॅण्ड सिनिटायझर, एनर्जी ड्रिंक व बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.
यावेळी अन्न औषध प्रशासनाचे अरुण गोडसे यांनी केलेल्या आवाहनानुसार, वाई तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने, करोना विषाणूपासून संरक्षण व्हावे यासाठी, वाई पोलीस स्टेशन कर्मचारी, पत्रकार बंधू व माथाडी कामगार बंधू यांना सॅनिटायझर, मास्क, ओआरएस लिक्विड व बिस्किटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वाई तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, अरुण पवार, सचिव प्रदीप मांढरे, खजिनदार प्रमोद शहा, संचालक देवीचा जैन, संदीप भूतकर व सभासद श्याम चावलानी, अमोघ पोरे, सुरेश ओसवाल, प्रशांत नागपूरकर व विक्रम घोटवडेकर इत्यादी सभासद उपस्थित होते.