नवी दिल्लुी – खाद्यतेल आणि खते आयातीवर सध्या मोठा खर्च होत आहे, त्यातून आपले आयातीचे बिल वाढत आहे ही स्थिती चिंताजनक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या आयातीमुळे भारताच्या तिजोरीवर दबाव येत असून या क्षेत्रात भारताला स्वावलंबी करण्याचे काम आपल्याला मिशन मोडवर करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, या वस्तू आपण ज्या देशातून आयात करतो त्या देशातील बिघडलेल्या स्थितीमुळे त्याच्या आयातीचे बिल वाढते. असाच फटका आपल्याला रशिया-युक्रेन युद्धामुळे बसला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च कमी करून भारताला स्वावलंबी बनणे आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्प आज कृषी सन्मान सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते सुरू झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, आयात खाद्यतेल, खते आणि कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करणे महत्त्वाचे आहे. सरकार परदेशातून 75-80 रुपये किलोने युरिया खरेदी करत आहे, परंतु शेतकऱ्यांना 5 ते 6 रुपये किलो दराने याचा पुरवठा केला जात आहे.
देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी बंद पडलेले सहा मोठे युरिया कारखाने पुनरुज्जीवित करण्यात येत असल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली, तसेच, नॅनो-युरियाचे उत्पादनही सरकारने वाढवले आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात भारतातील वनस्पती तेलाची आयात वार्षिक 70.72 टक्क्यांनी वाढून 18.93 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. 2021-22 मध्ये, भारताने 160.68 अब्ज मूल्याचे पेट्रोलियम आणि क्रूड उत्पादने आयात केली, हा सगळा वाढीव खर्च भारत सरकारच्या तिजोरीवर ताण देणारा ठरत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, सन 2015 मध्ये आपण डाळींचे उत्पादन वाढवण्याचे आवाहन देशातील शेतकऱ्यांना केले होते. त्या आवाहनाला भारतीय शेतकऱ्यांनी मोठाच प्रतिसाद दिला आणि त्यामुळे अलीकडच्या वर्षांत डाळींच्या उत्पादनात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे आयात अवलंबित्व कमी झाले आहे.
भारताला खाद्यतेलामध्ये स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सरकारने सुरू केलेल्या ऑइल-पाम मिशनबद्दलही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. आजकाल शेती उत्पादनातून काढल्या जाणाऱ्या इथेनॉलवर आणि शेतीतील कचरा आणि जनावरांच्या शेणापासून बायो-सीएनजीवर वाहने चालवण्याचे काम सुरू आहे. हा वापर वाढला तर भारताचे तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असे ते म्हणाले.