पुणे – करोना रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी शहरातील स्माशानभूमींमध्ये जागा कमी पडत असल्याने महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी वैकुंठ स्मशानभूमीत करोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येथील विद्युत आणि गॅस दाहिनीसोबतच पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी केले जात असले तरी, 24 तास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरूच असल्याने वैंकूठाच्या आसपासच्या घरांवर धुराची काजळी साठण्यास सुरूवात झाली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. विद्युत दाहिनीच्या चिमणीची रूंदी कमी असून धुरासोबत बाहेर पडणारी राख थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. ही राख नवी पेठ, सदाशिव, नारायण, कर्वे रोड, शास्त्री रोड भागातील इमारतींवर जाऊन थांबत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
त्याची गंभीर दखल घेत महापौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी चौधरी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह वैकुंठ स्मशानभूमीची पाहणी केली आहे. त्यानंतर या ठिकाणचा धुर कमी करण्यासाठी विद्युत, गॅस दहिन्यांमधील किरकोळ सुधारणा करण्यात येणार आहेत. यासोबतच धुर कमी करण्यासाठी “निरी’च्या माध्यमातून यंत्रणेची तपासणी केली जाणार असून “निरी’ने सुचविलेल्या निकषांनुसार बदल केले जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.