पुणे -गुंतवणुकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत फडणीस ग्रुप ऑफ कंपनीने 342 गुंतवणुकदारांना तब्बल 48 कोटी 85 लाख 60 हजार रुपयांना गंडा घातला. याशिवाय फडणीस यांच्यावर नाशिक येथेही गुन्हा दाखल झाला असून नाशिक पोलिसांनी त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. विनय फडणीस यांची कन्या सायली फडणीस हिला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असून न्यायालयाने तिला 28 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.
याप्रकरणी 2017 मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी विनय प्रभाकर फडणीस (51), अनुराधा विनय फडणीस (50, दोघे रा. रामबाग कॉलनी, कोथरुड), शरयु विनायक ठकार (50) आणि भाग्यश्री सचिन गुरव (50) यांना अटक केली होती. विनय फडणीस हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतरांना जामीन मिळाला आहे.
फडणीस प्रॉपर्ट्रीज लि., साहिल रिसोर्ट अँड स्पा, फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर, साहिल हॉस्पिटलिटी अशा वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन करून ब्रोकर उदय पाटणकर याच्यामार्फत व कर्वेनगर येथील कार्यालयात आणि इतर ब्रोकरच्या मदतीने नागरिकांना बॅंक दरापेक्षा जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला. कंपन्यांची नावे बदलून स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणुकदारांचे मूळ मुद्दल व व्याज परत न करता फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे.
या गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपी विनय फडणीस याची कन्या सायली फडणीस-गडकरी (27) ही फडणीस ग्रुप ऑफ कंपनीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे इतर आरोपींशी देखील नातेसंबंध आहेत. सायली फडणीस यांना गुंतवणुकदारांनी केलेल्या रक्कमेची माहिती असून त्या संबंधिची कागदपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करावयाची आहेत. गुंतवणुकदारांच्या रक्कमेतून खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती त्यांच्याकडे आहे. तसेच या रकमा कोठे वळविल्या, याची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे पोलिसांनी सायली फडणीस यांचा त्यांच्या घरी शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. त्यांचा अटकपूर्व जामीनही वरिष्ठ न्यायालयाने फेटाळला आहे. त्या न मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसा अतिरिक्त जिल्हास्तर न्यायालयात अर्ज केला आहे.