पुणे – जनता वसाहत, राजीव गांधीनगर वसाहत आणि पर्वती पायथा येथील झोपडपट्टी पुनर्वसन मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिसरात इमारतींच्या उंचीची मर्यादा 21 मीटरवरून 40 मीटरपर्यंत करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे केली आहे.
जनता वसाहतीच्या वरील बाजूस पर्वतीवर मंदिर आहे. पुरातत्त्व खात्याच्या यादीत श्रेणी-1 मध्ये या वस्तूचा समावेश होतो. त्यामुळे त्यांच्या परिसरात 21 मीटर उंचीपर्यंत इमारत बांधण्यास परवानगी आहे. पालिकेच्या बांधकाम नियावलीतील ही तरतूद “यूडीसीपीआर’ नियमावलीतही कायम आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्याच्या उत्तरेकडील परिसरातील पुनर्वसन करावयाचे झाल्यास सहा ते सात मजल्यांच्या सुमारे 125 इमारती उभाराव्या लागणार आहे.
त्यामुळे इमारतींच्या उंचीचे बंधन शिथिल केले, तरच पुनर्वसन करणे शक्य आहे. हे लक्षात आल्याने याबाबत उच्चस्तरीय बैठक होऊन या विषयावर चर्चा होऊन पुनर्विकास इमारतींची उंची वाढविल्यास पर्वतीच्या दृष्टीक्षेपामध्ये किती व कशी बाधा येऊ शकते, यांचा अभ्यास करून अहवाल सादर करावा, असे ठरले होते.
त्यानुसार “एसआरए’ने खासगी संस्थेकडून अभ्यास करून किती उंचीपर्यंतच्या इमारती उभारल्यास पर्वतीवरील मंदिराच्या दृष्टीक्षेपाला बाधा येऊ शकत नाही, याचा अहवाल तयार करून घेतला. त्यानुसार किमान 41 मीटर, तर जास्तीत जास्त 47 मीटर उंचीपर्यंत पुनर्विकास इमारती उभारणे शक्य होऊ शकते, असे निदर्शनास आले. त्या आधारावर प्राधिकरणाने पर्वती परिसरात झोपडपट्टी पुनर्वसनास इमारतींसाठी 21 मीटर उंचीचे बंधन शिथिल 40 मीटर उंचीपर्यंत योजना राबविण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव पाठविला आहे.
त्यास मनपा, नगररचना, गृहनिर्माण विभाग यांनी देखील उंचीची मर्यादा काढण्यास अनुकूल अभिप्राय दिला. सध्या हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे मंजुरीसाठी आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल, अशी आशावाद “एसआरए’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.