टोकिओ – जपान मधील सत्तारूढ पक्षाच्या नेता निवडीत बुधवारी फुमिओ किशिदा हे विजयी झाल्याने ते आता जपानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. करोनामुळे बिघडलेली अर्थ व्यवस्था आणि प्रादेशिक पातळीवर सुरक्षेला निर्माण झालेले नवीन धोके यावर त्यांना तातडीने लक्ष द्यावे लागणार आहे.
जपानचे मावळते पंतप्रधान योशिहिदा सुगा यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी ही नवीन नेताविड झाली आहे. सुगा यांना जेमतेम एक वर्षाचा कालावधी मिळाला. त्यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यातच देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. सोमवारी होणाऱ्या संसद अधिवेशनात किशिदा हे आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करतील.
पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण चार उमेदवार रिंगणात होते. पण किशिदा यांनी भारी बहुमताने अन्य तिघांवर मात केली. मावळते पंतप्रधान सुगा यांनी देशातील करोना स्थिती नीट हाताळली नाही म्हणून त्यांच्यावर जनतेचा मोठा रोष होता.
तशातच त्यांनी करोनाच्या काळात देशात ऑलिम्पीक स्पर्धा घेण्याचा एकतर्फी आग्रह धरला आणि या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्याने त्यांच्यावर राजकीय प्रतिस्पर्ध्यांनीही रोष व्यक्त केल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
जपान मध्ये पुढील दोन महिन्यातच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका सुगा यांच्या नेतृत्वाखाली जिंकणे अवघड बनल्याने सत्तारूढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने हा नेतृत्व बदल केला आहे. किशिदा हे जपानचे माजी विदेश मंत्री आहेत.