मुंबई – दहा दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाला यश मिळाले असून त्यांची थेट मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकीकडे पुन्हा शिवसेनेचाच नेता मुख्यमंत्री झालेला असतानाही शिवसेना भवनात आज शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आहे. तसेच शिवसेनेत होत असलेल्या विचित्र घडामोडीमुळे शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकीकडे दहा दिवांपासून सुरु असलेले बंडाचे राजकारण त्यात आज केलेला सत्ता स्थापनेचा दावा, सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा या सगळ्यामध्ये शिवसेना केंद्रस्थानी होती.
म्हणजेच एकनाथ शिंदे हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. मात्र त्यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवाय शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. हीच अस्वस्थता देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेननंतर आणखीच वाढली. कारण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार अशी घोषणा केली. यावरून शिवसेना व शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असायला हवे होते. मात्र राज्यभरात कुठेच काहीच दिसून आले नाही. शिवाय शिवसेना कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळला.
विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडापासून राज्यभरातील शिवसैनिक भरकटला होता. काल सायंकाळी देखील उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. मात्र आजच्या घोषणेनंतर शिवसैनिकांचा धक्काच बसला आहे.