प्रभात वृत्तसेवा पुणे, दि.10 -आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ, त्यावर उभारलेला रणशिंग पुष्प चौघडा आणि रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी, सोबतीला मर्दाणी खेळांसह ढोल-ताशांचा दणदणाट अशा दिमाखदार, अशा भावपूर्ण आणि तितक्यात जल्लोषात लक्षवेधक विसर्जन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
शुक्रवारी प्रथा-परंपरेनुसार सकाळी मंडईतील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. मानाच्या पाच गणपतीलाही ट्रस्टकडून पुष्पहार अपर्ण करण्यात आला. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर शुक्रवारी रात्री 11 वाजता प्रत्यक्षात या मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक रथाला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यावर चारही बाजूंनी रणशिंग पुष्प चौघडा उभारण्यात आले होते. तर या रथावर कोल्ड फायरच्या माध्यमातून विद्युत आतषबाजी करण्यात येत होती. त्यामुळे हा रथ गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
पांढऱ्याशुभ्र बैलजोडीने सजलेल्या या रथाचे सारथ्य उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी केले. मिरवणुकीच्या सुरवातीला भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा विराजमान असलेला रथ लक्ष वेधून घेत होता. त्यापाठोपाठ शिवयोद्धा मर्दाणी आखाडा यांच्या बाल कलाकारांकडून लाठी-काठी, तलवार बाजी, भाला खेळ अशा विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके साजरी केली जात होती. त्यापाठोपाठ “समर्थ’, “नादब्रह्म’ आणि “श्रीराम’ या ढोल ताशा पथकांचे वादन केले जात होते.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बेलबाग चौकात शनिवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी दाखल झाला. येथून ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्याकडे मार्गस्थ झाली. लक्ष्मी रस्त्यावर ही विसर्जन मिरवणूक आल्यानंतर विविध ठिकाणी परंपरेनुसार भाऊसाहेब रंगारी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
मिरवणूक मार्गावर ठिककठिकाणी नागरिकाकडून पुष्पवृष्टीही केली जात होती. ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.
टिळक चौकात जोरदार स्वागत
शनिवारी सकाळी नऊ वाजता टिळक चौकात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बापाच्या रथाचे आगमन झाले. याठिकाणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली. यावेळी चौकात भाविकांची प्रचंड गर्दी आली. गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया…या जयघोषाने संपूर्ण चौक दणाणून गेला होता. त्यानंतर ही विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.