प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 10 -पुण्याचा गणेशोत्सव “याचि देही याची डोळा’ उत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक पुण्यात येतात. यामुळे मागील 11 दिवस पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहिला. तर विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस तब्बल सलग 44 तास उभे होते. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली.
बाप्पांच्या स्वागतासाठी पुणे पोलिसांनी 30 ऑगस्टपासून तब्बल साडेआठ हजारांचा बंदोबस्त शहर-उपनगरांत तैनात केला होता. बाप्पांचे दर्शन, आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. विशेषत: गौरी विसर्जनानंतर पुढील पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत राज्य शासनाकडून सुट दिल्यामुळे गर्दीने उच्चांक गाठला.
सुट्ट्या रद्द
गणेशोत्सवामुळे सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करून त्यांना बंदोबस्तासाठी तैनात केले. त्यात उत्सव निर्बंधमुक्त असल्यामुळे मिरवणुकीला होणारी अलोट गर्दी आणि पोलिसांची संख्या तुलनेने कमीच. अशा परिस्थितीत पोलिसांनी दि. 8 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून बंदोबस्त तैनात केला. सायंकाळे साडेसहा वाजेपर्यंत हा बंदोबस्त सुरू होता. तब्बल 44 तास हा बंदोबस्त होता.
वाहतूक पोलिसांचे घसे कोरडे
शहरात येणारे प्रमुख रस्ते बंद करून वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे दोन दिवसांपासून पर्यायी रस्ते सांगणे, बंद असलेल्या रस्त्यावर जाऊ शकत नाही म्हटल्यावर नागरिकांकडून होत असलेली विचारणा, त्यावर उत्तरे देताना वाहतूक पोलिसांचे घसे कोरडे पडले. तर वाहतूक वळविताना दमछाक झाली. मिरवणूक संपल्यानंतर मंडळांचे ट्रॅक्टर, वाहने शहराबाहेर पडल्यानंतर मध्यवर्ती भागातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.