पुणे: गणेशोत्सवात मानाचे स्थान असणाऱ्या अखिल मंडई मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव यंदा साधेपणाने होणार आहे. मागील 127 वर्षांच्या परंपरेत यंदाच्या गणेशोत्सवात प्रथम मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना मंदिरात होणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन करणार असल्याची भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे. या अनुषंगाने अखिल मंडई मंडळाने गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर आदी उपस्थित होते.
“दरवर्षी मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदाच्या उत्सवाला मुरड घालून मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. मंडळाच्या अनेक चांगल्या उपक्रमांचे अनुकरण पुण्यातील इतर मंडळे करतात. त्यामुळे यंदाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सव मंडळांनी मंदिरातच उत्सव साजरा करावा,’ असे थोरात यांनी नमूद केले.
मास्क अनिवार्य
“127 वर्षांच्या उत्सवाच्या परंपरेत पहिल्यांदाच शारदा गजाननाची मूर्ती मंदिरातून मंडपात हलविण्यात येणार नाही. यंदा मंदिरातच सर्व धार्मिक विधी साजरे होणार असून, यावेळी सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यावेळी सॅनिटायझर, मास्क असल्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही,’ असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.